September 6, 2010

ठोसेघर


ठोसेघर

पुण्याचे एक वैशिष्ठ म्हणजे तुम्ही २०-३० किलोमीटर गेला की निसर्ग तुमचे मनापासून स्वागत करतो. मुळशी, मावळ या भागाला तर निसर्गाने भरभरून दिले आहे. पण आम्ही नेहमीचा रस्ता सोडून कुठे तरी जायचा बेत ठरवला. सातारा पासून २०-२५ किलोमीटर असलेले ठोसेघर धबधबा दीपा ने आजून पहिला नव्हता. (त्यात तिचा कही दोष नाही, जवळ जवळ सर्व मुंबईकरांचा लोनावाला, महाबलेश्वर झालेच तर माथेरान याशिवाय दुसरीकडे कुठे भटकंती करता येते या वर विश्वास नसावा. किंवा त्यांचा ते गावी ही नसावे. असो.)

सकाळी गड़बड़ करून पहाटे ( ११ वाजता ) सातारा कड़े कूच केले. रस्ता खुप चांगला असल्यामुळे कधी सातार्यात पोहोचलो ते समजलेपण नाही. सातारा मधे पत्ता कोणालाही विचारू नये. कारण आम्ही एक दोन लोकाना ठोसेघर चा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला, पण ज्याला पत्ता विचारू तो जणू काही ओसामा बीन लादेन चा पत्ता विचारला असे भाव करून 'सरळ जा' असे सांगत होता. एक रिक्षावाल्या काकांनी तर कमाल केली, "ठोसेघर ला जाचे? सोपा आहे. बोगदा रस्ता पकडा आणि सरळ जा". "पण हा बोगदा रस्ता कुठे आहे?". "सरळ जा आणि तुम्हाला एक शिवाजी पुतळा लागेल, तिथे डावीकडे वळा. तोच बोगदा रस्ता". 'डावी कडे वळा' हे त्यांनी उजव्या हाताने हवेत अर्धगोल काढून रीतसर उजवीकडे दाखवले होते. 'काय बोलतो पेक्षा काय करतो' याला जास्त महत्व असते या रामदासांच्या वचना प्रमाणे आम्ही डावीला मनात उजवी करून पुढे निघालो. पुढे शिवाजी पुतळा ला रीतसर उजवी कडे वळून आम्ही बोगदा रस्ता पकडला.
बोगदा तसा फार लहान आहे, पण त्याच्या नावाने रस्ता ओळखला जावा इतके त्याचे वजन आहे. बोगदा पार केल्यावर जणू काही सिनेमा ची रीळ बदलावी असा निसर्ग बदलला. धुक्यानी सगळी वाट झाकली गेली होती. खूप पाउस नसला तरी अधून मधून एखादी सर येत होती. एके ठिकाणी गाडीच्या बंद काचा उघडल्या तर गाडी मध्ये धुके आले. जवळचे पण काही दिसेना. 

वाटेत बरेच लोक आपल्या शेळ्या, गायी चरायला घेऊन आले होते. एरवी बोजड वाटणारे डोंगर सुद्धा हिरव्याशालीमुळे  नाजूक वाटत होते. चहाचे मळे जसे चाऱ्या पडून बनवतात त्याच सारखे डोंगरावर हिरवे गावात उगवले होते. हवेत खूप गारवा होता.


हवेतील ऑक्सिजन २०० टक्के असल्या सारखे वाटत होते. पावसामुळे रस्ते एकदम स्वच्छ धुवून निघाले होते. घाटाचा रस्ता खूपच कमी वाहतुकीचा होता. मधूनच एखादी जीप समोरून येत होती. 




वळणे वळणे पार करत शेवटी आम्ही ठोसेघरला पोहोचलो. मी जवळ जवळ १०/१२ वर्षाने ठोसेघर ला येत असेन. मला वाटले खूप गर्दी असेल पण इथे चीट पाखरू पण नव्हते. गाडी लावायला एका ध्याब्या समोर जागा आहे. धाबातील आजोबांकडे जेवण मिळेल याची खात्री करून धबधब्याकडे निघालो. सातारा वन विभागाने धबधब्याकडे जाण्यासाठी सिमेंटच्या पायरया केल्या आहेत. दुरवर असून आम्हाला पाण्याचा स्पष्ट आवाज येत होता. थोडे अंतर पुढे गेल्यावर आम्हाला धबधब्यचे पहिले दर्शन झाले.धबधबा एक दम विलोभनीय होता. खरेतर इथे एक नसून दोन धबधबे आहेत. दोनही जवळजवळ २०० फुट असावेत. जिथे धबधबा जमिनीवर पडत होता तिथून एक १०० फूट परत वर पाणी उडत होते.


आम्ही थोडावेळ थांबून परत निघालो. पोटात कावळे आक्रोश करत होते. परत वर जात असताना आजून एक वाट दिसली. त्या वाटे वरून गेलो तर आजून एक मोठ्ठा धबधबा दिसला. तोही २०० ते २०० फुट खोल असावा. पण तो तीन विभागात वाटला गेल्या मुळे वेगळा भासत होता. तो १०० फुटावर एका दगडावर पडून मग परत १०० फुट अजून एका दगडावर पडत होता. 
पाय निघत नसला तरी पापी पेट थांबू देत नव्हते. आम्ही जेवणं साठी परत धाब्याकडे निघालो.

एक गोष्ट चांगली वाटली - वन-विभागाने दोन्ही ठिकाणी सिमेंटचा डेक बनवला आहे. त्यामुळे धबधबा पाहणे सोपे आणि सुरक्षित झाले आहे.

वर येऊन जेवणावर यःतेच्छ ताव मारून परत पुण्याकडे येण्यास निघालो. भरपेट जेवण आणि अमुराद निसर्ग चा आनंद लुटला मुळे झोप येत होती. पण घाटात एक ठिकाणी फक्कड गरम गरम मसाला चहा मिळाला. जरा काळ सूर्य देवता आपले दर्शन देण्यासाठी बाहेर आले आणि कधीही पुण्यात न दिसणारे इंद्रधनुष आम्ही अनुभवले. सूर्य देवाचा बहुदा झोपेचा ब्रेक असावा.आम्ही हि आमचा प्रदूषण विरहीत हवेचा, नो ट्राफिकचा ब्रेक संपून रात्री पुण्यात परतलो.