May 5, 2010

आंबा पुराण

उन्हाळा आवडणारा प्राणी (म्हणजे मनुष्य प्राणी हो) शोधून सापडणार नाही. अहो कसा आवडणार? आठवा ते उन ! आठवा त्या घामाच्या धारा !  आठवा तीच तीच फ्यान ची गरम हवा ! कुठे जायची सोय नाही. सकाळी आठ साडे-आठ पासून उन्हाचा चटका जाणवल्या शिवाय राहत नाही. कसा आवडणार? पण मला लहानपणापासून उन्हाळा आवण्याची दोन ठळक कारणे आहेत. एक आंबा आणि दोन दुसरा आंबा !

खरच निसर्गाची काय किमया आहे कि नाही? देवाने वेळात वेळ काढून आंबा बनविला असणार. या फळाची गोडीच वेगळी. दुसरी फळे याचा समोर अगदीच बिचारी वाटतात. म्हणजे बघा सचिन तेंडूलकर आणि इतर फलंदाज याची तुलना करून पहा बर. तुलना करताना विचित्र वाटते ना? तेच सांगतोय आंब्याशी तुलना होयुच शकत नाही.

लहानपणी मी पितृपक्षची वाट पाहायचो. आम्ही त्या दिवशी आंबा खायला सुरवात करायचो. (का? माहित नाही. कदाचित तोपर्यंत आंब्याचे भाव खिशाला परवडतील असे होत असावेत). आंबे आणायला मी पप्पा बरोबर न चुकता जात असे. आंब्याच्या दुकानातला सुवास अगदी मंत्रमुग्ध करून टाकायचा. तिथे ठेवलेली आंब्याची रास पाहताना किती आंबे घेऊ आणि किती नको असे होत असे.  बर हे सगळे आंबे काही एका घराण्यातले नसायचे. कोणी देवगडचा, कोणी रत्नागिरीचा. आणि घराणे जसे वेगळे तसे घराण्यात परत जाती, कोणी हापूस, कोणी पायरी, कोणी तोतापुरी आणि पारंपारिक जातीय पद्धती प्रमाणे आंब्याला मानाची वागणूक मिळत असे. हापूसची स्वारी मानाप्रमाणे छान पेटी मध्ये वगैरे असायची. या उलट तोतापुरीच्या वाट्याला  कोपऱ्यातील टोपली ! मला आजून पर्यत कुणीही दुकानदारने तोतापुरी पेटीत दिला नाहीये.
अजून एक जाणवणारा फरक,  हापूस हा एकतर तीन, पाच किंवा दहा डझन याच पटीत विकला जायचा आणि तोतापुरीची उडी मात्र जास्तीस जास्त एक डझन पर्यंत.

लहानपणी आंबे खाल्ले याची साक्ष शर्टवर पडलेले पिवळे डाग बिनधास्त देत असत. खाताना दोनही हातावर रसाची धार आली नाही तरच नवल. आणि ती धार चाटून पुसून साफ केली नाही तर दुसरे नवल. आंबे खाण्याची हि पद्धत जवळजवळ सगळ्या भावंडानी आत्मसात केली होती. ती एका परंपरेनुसार मोठा भाऊ छोट्या भावाला प्रात्यक्षिकासह शिकवत असे. एका आंब्यावर माझे कधी भागले नाही. एक तो दुश्मन खाते है ! या थाटात मी आंबे रिचवत असे.

आईचे आंब्यावरचे प्रेम फक्त 'चला आता वेगळी भाजी टाकायची गरज नाही' या पुरते मर्यादित होते. आणि आंबरस पोळी हा कुणालाही कधी आवडेल असा मेनू आहे. त्यामुळे तिचे रोज रोज भाजी न करावी लागल्याने ती खुश आणि रोज रोज आमरस पोळी म्हणून आम्ही खुश अशी व्यावास्तापान्शात्रातील विन-विन सिचुवेशन होत असे.


परवा मोर मध्ये साउथ आफ्रिकन अल्फान्सो - ६० रुपये प्रती नग पाटी वाचली आणि मनात चर झाले. हापूस हा मान कोकणाचा ! तो साउथ आफ्रिकन अल्फान्सो कसा घेऊ शकतो? नंतर एक दोन दिवसात कोकणातील बराच आंबा आता निर्यात होणार असे वाचनात आले. म्हणजे कोणी गोरा तिकडे पल्याड बसून, आमच्या रत्नागिरी हापूस आंब्याचा 'इंडिअन अल्फान्सो' असा उच्चार करीत आस्वाद घेणार तर !


बर हे सगळे आंबा पुराण सांगायचे कारण असे की, काल आरुषला पारंपारिक पद्धतीने आंबा खाताना पाहून माझीही इच्छा बळकावली. आणि एक आंबा मी ही त्याच पद्धतीने रिचवला. नंतर दोघेही आंबा खाल्याची साक्ष देणारे शर्ट घरभर मिरवत होतो.  लहानमुला मध्ये दुसरे बालपण जगतात हे म्हणणे काही उगाच नाही.