January 22, 2010

एका ट्रेकची गोष्ट (नव्हे फजिती) !
(संग्रहित आठवणीतुन)



 

"....एकमेंकाना  धरून आम्ही चौघे त्या निमुळत्या कड्याच्या एका टोकाला जीव मुठीत घेउन कसेबसे उभे होतो आणि अचानक हवेत खुप गारवा जाणवू लागला. काही समजायच्या आता पुढच्या सेकंदाला जोरात पाउस सुरु झाला. दोन फूटावरचे पण नीट दिसेनासे झाले. समोर दरी आणि परत जाण्याचा मार्ग पावसाने निसारडा झालेला अशा विचित्र त्रिशंकु अवस्थेतेत आम्ही नवखे गिरिप्रेमी सापडलो होतो...."   

पावसाळयाचे दिवस सुरु झाले की ओढ़ लागते ती सह्याद्रीच्या कड्या कपारीतुन भटकंती करण्याची आणि इच्छा होते ती शिवाजी महाराजांचा पुस्तकात वाचलेला इतिहास जवळून पहाण्याची. 'स्वामी', 'जाणता राजा', 'सिंहगडाला जेंव्हा जाग येते' या इतिहासकालिन साहित्यातील पाने वाचताना अंगावर येणारा काटा परत अनुभवन्यासाठी आम्ही मित्रानी ठरवले की एका ट्रेकला जायचे. सुरवातीला चांगला सात संख्या असणारा कोरम जाण्याच्या दिवसापर्यंत  फक्त चार (मी, जम्बो, वैभव अणि श्रीराम) वर येउन ठेपला. जाण्यास सोपा आणि मी तिथे आधी जाउन आलो असल्याने 'किल्ला तिकोणा' हा सर करण्याचे आम्ही ठरवले.

तालुका मावळ आणि पौड़ पासून तीस किलोमीटरवर हा किल्ला आहे. त्याच्या त्रिकोनी आकाराने त्याला तिकोणा हे नाव पडले असावे.

 जाताना आम्ही वनाज़ कॉर्नर येथून सकाळी आठ वाजता पौडला जाणारी जीप  पकडली. चौघे गडावर मुक्काम करणार होतो आणि तशा तयारीनेच निघालो होतो. झाले तर तिकोणा पासून जवळ असणारा तुंग किल्ला पण पाहता येईल असा विचार करत होतो.काही वेळाने आम्ही पौड़ ला येउन पोहोचलो. तिथून थोडा वेळ वाट पाहून आम्हाला तिकोणापेठ गावाला जाणारी एक बस मिळाली. हे गाव गडाच्या पायथ्याशी आहे. सुमारे तासभर प्रवास करून आम्ही तिकोणापेठला पोहोचलो. एसटी स्टैंड वर चहा घेउन आम्ही गडाकड़े जाणारया छोट्या वाटेने निघालो. सुमारे बाराची वेळ होती पण पावसाळयाचे दिवस आसल्याने उन जाणवत नव्हते. हवा अल्लादायक होती. आम्ही भरभर चालत होतो. गप्पा मारत चालताना श्रम वाटत नव्हते.

अंदाजे पन्नास मिनिटे चालल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागला. तेथून पवना धरणाचा परिसर खुप छान दिसत होता. जवळच पाण्याची तीन चार टाकी होती.  "चायला, इथे एखादा बिबट्या तर लपून बसला नसेल ना?" इतका वेळ वॉकमन वर गाणी ऐकनारा जम्बो बडबडला. आमची जरा टरकली. शुभ बोल नारया असे म्हणत पुढे निघालो.

वर पोहोचल्यावर आम्ही गडाची जुजबी पाहणी केली. गडावर पाण्याची आजून दोन-चार टाकी होती. महादेवाचे मंदिर होते. विशेष म्हणजे मंदिरजवळच काही गुहा होत्या. आम्ही आत जाउन, इथे रहता येइल का हे पाहत होतो आणि इतक्यात दहा बारा वटवाघुळ एकदम बाहेर उडाले. रात्री आत राहणे धोकादायक ठरू शकते म्हणुन आम्ही गुहेच्या बाहेर आँगण होते तिथे झोपायचे ठरवले. दुपारचे आता तीन वाजले. चालल्याने भूक लागली होती. घरून जेवण आणले आसल्याने जेवण बनवावे लागणार नव्हते. "आधी जेवण करण्यात यावे आणि मग गडावर चक्कर मारण्यात यावी" असा ठराव एकमताने पास झाला.

जेवण झाल्यानंतर सैक गुहेत ठेउन आम्ही गडाचा फेर फटका मारन्यासाठी  निघालो. रात्रीसाठी मैगी (नुडल्स) करायचे होते. आगीसाठी सरपण शोधणे गरजाचे होते . सरपण शोधुच आणि उद्दया तुंगला जायचा  रस्ता पण शोधुयात हा विचार करत आम्ही निघालो. आधी मी इथे येउन गेलो आसल्याने मला रस्ता कुठे आहे याचा तसा अंदाज़ होता. थोडा वर गेल्यावर आम्हाला अजुन उंच एक माची (बुरुज) दिसली. आम्ही चटकन तिथे गेलो.

त्या माचीवारून आजुबाजुचा परिसर खुप मनोहर दिसत होता. एका बाजूला पवना धरण,  दुसरया बाजूला लोहगड , विसापूर किल्ले होते. माची खुप मोठी नसली तरी चौघाना उभे राहता येइल इतकी पुरेशी होती. संध्याकाळ होत होती. सूर्य नेहमीपेक्षा खुप मोठा वाटत होता. सगळी कड़े सोनेरी प्रकाश पडला होता. त्यात धरणाचे पाणी सोनेरी वाटत होते आणि किनारयावर बांधून ठेवलेली एक नाव  उगाच वारयाबरोबर हुज्जत घालीत होती.आभळ नव्हते. पण काही काळ्या ढगांचे गठ्ठे निळ्या आभळवर उठून दिसत होते. त्यांच्या कडा चमकत होत्या. पक्षी मधुनच आवाज करीत घराकडे जात होते. सूर्य आजचे भ्रमण संपून चंद्राला खिजवत अस्ती गेला. गडाचा परिसर संधीप्रकाशाने उजळत होता. आकाशात चांदण्या आधिक ठळक होत होत्या.  धरणाचे पाणीही  रंग बदलून काळ झाल. थोड्याच वेळात संपूर्ण अंधार झाला.

एखाद्या जादूगरा प्रमाणे निसर्ग ही जादू रोज करत असतो पण आपण याचे किती वेळा साक्षीदार असतो? हा प्रश्न प्रत्तेकाच्या मनात येउन गेला. परत गुहेकडे येताना शक्य तितके सरपण घेउन गेलो.


रात्री मस्त नुडल्स केल्या. भूक लागली नसल्याने थोडा वेळ गप्पा मारत बसलो. 'शिवाजीराजे इथे आले असतील, इथे घोड़े घेउन फिरले असतील' असे अकलेचे कांदे सोलून झाल्यानंतर आम्ही कांदा न घातलेल्या नुडल्स खाऊन सुमारे बारा वाजता झोपी गेलो.

रात्री खुप जवळून बोलल्या सारखा आवाजाने आम्हाला जाग आली. आवाज येत होता पण जवळ कोणी नव्हते. नीट ऐकले असता तो आवाज गावातून येत होता. गावत काही तरी कार्यक्रम असावा. आम्ही परत झोपी गेलो.

सकाळी जाग आली तीच पक्ष्यांच्या किलबिलटाने.  सर्व आवरून आणि मस्त चहा मारून आम्ही तुंगला जाण्यासाठी निघालो. मला वाट माहीत असल्याने मी पुढे चालत होतो. माझ्या मागे श्रीराम, मग वैभव आणि शेवटी जम्बो होता. आम्ही सगळे नेहमीचीच पायाखालची वाट असल्यासारखे निघालो. समोर लांब तुंग दिसत होता. त्याच्याआधी पवना धरण दिसत होते. थोड़े ढग होते पण पाउस नव्हता. आम्ही भरभर चालत होतो. वाट कधी वर तर कधी खाली जात होती. वाट अवघड होती तरी बरीच तुडवली गेल्या सारखी दिसत होती. कदाचित गावकरी हिचा वापर येण्याजाण्यासाठी करत असणार असा विचार करत असतानाच दहा ते बारा फूटचा उतार आला. इथे  वाट आणखीच अवघड झाली. मी थोडा थांबलो. मला पुढे उतार संपल्यावर फक्त एक मोठा दगड दिसत होता आणि त्याचातुन आम्ब्याचे छोटे  झाड उगवले होते. मी सर्वाना जपून जावे लागेल असे सांगितले. मी काळजी घेत,  दहा ते बारा फूटचे अंतर कापून त्या मोठ्या दगडा जवळ पोहोचलो. माझ्यामागे श्रीरामही आला. वैभव आणि जम्बो उतरत होते. मी दगडाच्या पुढे रस्ता कसा आहे ते पाहत होतो. मला खाली लगेच रस्ता दिसत नव्हता. श्रीरामने वाकून पाहून खाली कदाचित खोल दरी आहे असे सांगितले. इतक्यात वैभव आणि जम्बो दगडाजवळ आले. तिथे चौघना उभे रहता येइल इतकीही जागा नव्हती.

एकमेंकाना  धरून आम्ही चौघे त्या निमुळत्या कड्याच्या एका टोकाला जीव मुठीत घेउन कसेबसे उभे होतो आणि अचानक हवेत खुप गारवा जाणवू लागला. काही समजायच्या आता पुढच्या सेकंदाला जोरात पाउस सुरु झाला. दोन फूटावरचे पण नीट दिसेनासे झाले. समोर दरी आणि परत जाण्याचा मार्ग पावसाने निसारडा झालेला अशा विचित्र त्रिशंकु अवस्थेतेत आम्ही नवखे गिरिप्रेमी सापडलो होतो. एक पाच मिनिटानी पाउस थांबला. आम्ही तो पर्यंत एकदम चिम्म भिजुन गेलो होतो. परत आलेल्या वाटेवर नजर टाकली तर आपण याच वाटेने आलो यावर विश्वास बसत नव्हता. वाट वाहून गेली होती आणि खुप चिखल झाला होता. जम्बोने वर जायचा प्रयत्न सुरु केले. पण रस्ता इतका निसारडा झाला होता की तो दोन फूट वर जायचा आणि तीन फूट खाली यायचा. बर जम्बोचा थोडा तोल गेला तर एका वर एक पडून आमचा कड़ेलोट झाला असता. कोणालाच काहीही सुचत नव्हते.

बराच वेळ गेला आम्ही तिथेच अड़कुन होतो. मी परत एकदा दगडापुढे नजर टाकली. कदाचित इथुनच खाली जाता येइल असा विचार केला. तुंग समोरच दिसत होता. मी वर ऐवजी खाली जाण्याचा विचार मांडला. "मी इथून उडी मारतो. रस्ता असेल तर तुम्हाला पण बोलावतो." - मी म्हणालो. पण तिघानी याला नकार दिला. आता वर जाणे इतका एकच मार्ग होता.

इतक्यात आम्हाला जवळच पडलेली एक लाब काठी दिसली. बुडत्याला काडीचा आधार म्हणुन ती घेतली. ती काठी वापरून आपण वर चढूयात असा विचार झाला. सर्वात पुढे जम्बो, मग वैभव, श्रीराम आणि मी सर्वात कड्याच्या टोकाला अशी स्तिथी होती. आम्ही सगळ्यानी ती काठी घट्ट पकडली आणि जम्बोला पुढे जायला सांगितले.  त्याला काठीचा आधार घेता येत होता. बराच वेळ प्रयत्न करून तो कसाबसा उताराच्या सुरवातीला जावून पोहोचला. आम्हाला थोड़े हायसे वाटले. पण आजून मोहिम संपली नव्हती. जम्बोने आता वरून काठी पकडली. मग वैभव, त्याचा मागे श्रीराम आणि शेवटी मी सावकाश वर गेलो. आम्ही तिघेही सुखरूप वर आलो होतो.

आम्ही त्या काठी कड़े पाहिले. तीची छाती आभिनानाने फुगून आली होती. मी तुम्हाला वाचवले आहे असे ती सांगत होती. ते खरेही होते. कारण अजुन किती वेळ आम्ही तिथे थाम्बू शकलो असतो? आणि परत पाउस आला असता तर? 

यात जवळ जवळ  आमचे २ तास गेले होते तेंव्हा आता सरळ आल्या रत्याने परत जाऊ. तुंग परत कधी करुयात. असा विचार करून  परत आल्या मार्गाने चालू लागलो. जाताना रस्ता माहितीचा झाला कारणाने भरभर चालत होतो. एका ठिकाणी काही माणसे येतांना दिसली. राम राम झाल्यावर त्यानी सांगितले पुण्याला जाणारी एसटी कधीच गेली आहे. तुम्ही पवनाला जा आणि तेथून लोनावाला किंवा कामशेतला जाणारी जीप मिळेल. आता दूसरा पर्याय नव्हता आम्ही पवनाला जाण्याचा मार्ग विचारला आणि चालायला सुरवात केली.

थोडा चालून गेल्या वर एक  डांबरी रस्ता लागला. तो चांगला ट्रक जाईल इतका मोठा होता.अजुन थोड अंतर चालून गेल्या वर 'पवना ५ किलोमीटर' ही पाटी दिसली. मोठे संकट पार करून आल्याने  आम्ही हा वॉक चांगलाच एन्जॉय करत पार केला. पवना मधे पोहोचल्यावर एसटीने लोनावाला गाठले आणि नंतर लोकलने थेट पुण्याला निघालो ते लवकरच तुंगला सर करण्याचा निश्चय करूनच !


काही नोंदी -


१. जम्बो वॉकमन वर 'प्यार किया तो डरना क्या' ची गाणी ऐकत होता.
२. पवनाच्या रस्त्याने परत जाताना 'आपण कोणत्या ठिकाणी अडकलो होतो?' हे शोधण्यासाठी त्या आम्ब्याच्या झाडाचा   फायदा झाला.
३.  पवनाच्या रस्त्याने परत जाताना एके ठिकाणी हिंदी चित्रपट 'सोल्जर' चे चित्रीकरण चालू होते.
४. सेट वर चौकशी करता समजले की या चित्रपटात बौबी देवोल आहे आणि तो कालच तिथे येउन गेला.
५. "बिबट्या आला तर?" या विषयावर इतक्यांदा चर्चा झाली की बिबट्या अगदी खरा आला तरी फारसे आश्चर्य वाटले नसते.
६.  नंतर ती काठी आम्ही पुण्यापर्यंत बरोबर आणली.

January 19, 2010

द्रविड़ पानवाला
(संग्रहित आठवणीतुन)

शीर्षक वाचून जरा थबकला असाल नाही? पण घाबरू नका. इथे आपण क्रिकेटपटू राहुल द्रविड़ ला पानवाला म्हणत नाही आहोत. तर एका पानवाल्याची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. कुठून बर सुरवात करू?


तसा मी काही पान खाण्याचा शौक़ीन नाही. अगदी लहान असल्यापासून 'लहान मुले पान खात नाहीत' हे वाक्य मनावर इतक्यांदा ठासवाले होते की पान खाण्यासाठी  (वयाने किंवा शरीराने) खुप मोठे व्ह्यावे लागते आशी एक समजूत झाली होती. याच निकषावर 'चहा' या आणखी एका पेयाला दुय्यम वागणूक होती. पण नोकरी सुरु झाल्यानंतर मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेलो की हमखास पान खाणे होत असे. काही मित्र (वैभव, जम्बो) आमच्या भाषेत सांगायचे तर 'दर्दी' होते. त्याना विशेष पान लागे. तेही एका ठराविक पानवाल्याकडून ! आम्ही एक टोकाला पिरंगुटच्या बुलिंदा धाब्यावर मस्त गावरान कोम्बडी खाल्ली आसली तरी पान खायला मात्र दुसरया टोकाला करिश्मा चौकात जाणार.


तसे पानवाले मी बरेच पाहिलेत (आता). शांत, जास्त न बोलणारे, खुणेनेच कोणते पान हवे? त्यात काय काय हवे? काय काय नको? हीच पानवाल्याची खरी ओळख. पण हा पानवाला तसा नव्हता. त्याचा एक वीक पॉइंट होता तो म्हणजे क्रिकेट आणि नुसता क्रिकेट नाही तर 'राहुल द्रविड़'.

द्रविड़ त्याचा जीव की प्राण होता. त्याला द्रविड़ मनापासून आवडायचा. द्रविड़ कसाही खेलला तरीही "तो सध्या फॉर्म मध्ये नाहीये नाही तर बघा" हेच सांगायचा. तुम्ही कितीही वाजता त्याचा दुकानावर जा, एक दोन वाकयामध्ये द्रविड़चा उल्लेख असयाचाच. तो द्रविड़ चा जबरदस्त चाहता होता. त्याचाकडे गेले की अर्धा तास तरी गेलाच. त्याचाकड़े एक छोटा रेडियो होता. त्यावर तो टेस्ट मैच ची कोमेंट्री ऐकाचा. द्रविड़ खेळत असेल  तर सरळ दुकान बंद करून घरी जायचा. मला आठवतय एकदा पान घेताना तेंडुलकर विरुध द्रविड़ हा सामना चांगलाच रंगयाला होता अमोल आणि त्याच्या मध्ये.

त्याला क्रिक्केट मधील किती माहित होते हे काही सांगता येणार नाही. द्रविड़ लवकर आउट झाला तरी त्याचा कड़े काही तरी कारण आसयाचे आउट का झाला? याचे. एकदा द्रविड़ला  गांगुली ने रन आउट केले. त्या दिवशी त्याने गांगुलीला इतक्या शिव्या घातल्या की, चैपलने पण "आरे जाऊ दे" असे म्हंटले असते.

 नंतर व्हायचे तेच झाले आम्हाला द्रविड़ चा ओवरडोस झाला आणि आम्ही त्याच्या दुकानात जाणे बंद केले. आता बरेच दिवस झाले त्याच्या दुकानावर गेलो नाही. पण  मला खात्री आहे आजही तुम्ही करिश्मा चौकात गेलात तर तो कुणाला तरी "ती द्रविड़ ची इन्निंग काय मस्त होती ना?" हेच सांगताना दिसेल.