April 13, 2010

माझी लढाई

माझी लढाई


मी रोज प्रत्येक प्रहरात कोणती न कोणती लढाई लढत असतो.  सुरवात होते ती सकाळच्या लढाईने; ती असते झोपेशी !  मला लहानपणी शनिवार आवडायचा नाही कारण सकाळची शाळा !  लहानपणा पासूनच मी ही झोपेशी लढाई खेळत आलो आहे. अजूनही ती चालूच आहे. घड्याळवर चार पाच सहा सात हे आकडे संध्याकाळी वेळ दाखवण्याची पंचायीत नको म्हणून असतात असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे '१ जानेवारी पासून मी सकाळी पळायला जाणार आहे' या माझ्या संकल्पाला कोणाही सीरीओसली घेत नाही. मी बरेच उपाय करून पाहिलेत त्यापैकी जाहीर करता येतील ते असे - १. तीन वेग वेगळी गजराची घड्याळे वेग वेगळ्या ठिकाणी ठेवणे २. उशीवर ज्या वेळेला उठायचे तितक्यावेळा टकटक करायचे. ३. उन येईल या पद्धतीने खिडकी उघडी ठेवायची ४. बायको ला ... ... असो


नंतर ची लढाई हि ऑफिसला पोहोचल्यावर सुरु होते. पार्किंग शोध लढायी ! तसा मी रोज वेळेवर (म्हणजे माझ्या वेळेला) ऑफिसला जातो. पण  मला मात्र पार्किंग फुल चा बोर्ड पाहून रोज दुखः होते. बर बाहेर गाडी लावयाची म्हणजे काय गेट बाहेर लगेच जागा मिळते काय? माझ्या सारखे वेळेवर (परत आपआपल्या वेळेवर) येणार्यांची संख्या बरीच आहे त्यामुळे बाहेरचे पार्किंगही फुल झालेले असते.  रिकाम्या जागेवर बारीक नजर ठेवत, हळू हळू गाडी पुढे नेत शेवटी एक रिकामी जागा दुरून आपल्या डोळ्यात भरते पण आपण इथे पोहोचू पर्यंत अजून कोणी एका वीराने ती पटकावली असते. मग हताश न होता पुढची जागा नक्की आपली असे म्हणत मनाला आधार द्यावा लागतो. इतक्यात फोन आपले अस्तित्व ( नको तिथे) सिद्ध करून वाजतो. दुसऱ्या बाजूला कोणी तरी मीटिंग साठी आपली वाट पाहत थांबलेला असतो. त्याला जिना चढतोय. पोहोचतोच असे सांगून, दोन एक शिव्या देत, लेकाचा काय पंतप्रधान समजतो काय स्वतःला?  म्हणत फोन बंद करतो.आणि दुरून एक जागा रिकामी दिसते. जवळ जाता 'इथे पार्किंग करू नये - नाही तर हवा सोडण्यात येईल' ही ओळखीची पाटी स्वागतास सज्ज असते. आता माझा धीर सुटत असतो. इतक्यात फोन परत वाजतो.  तो उचलण्याची शक्ती नसते. सरते शेवटी दूर ( साधारणपणे १ कि मी) एक छोट्टी जागा मिळते.मग एका हातात डबा, एका हातात laptop  असे करत तितकेच अंतर मला चालत जावे लागते.,मला वाटते ऑफिस मध्ये लोकांना मी बहुदा चालत ऑफिसला येतो असे वाटत असणार. कारण मला गाडी घेऊन ऑफिस मध्ये फार थोड्या लोकांनी पहिले आहे.....असो

संध्याकालची लढाई असते ती ट्राफिकशी ! पुण्यात हि लढाई न पाहिलेला सापडणे कठीण आहे. माझ्या ऑफिस जाण्याच्या मार्गावर आता PHD होयील कदाचित. जो कोणी भेटतो तो ऑफिस कुठे आहे विचारल्या नंतर; कल्याणी नगर? बापरे ! मग कोथरूड वरून कसा जातोस? हा ठरलेला प्रश्न विचारतो. मला पुढील संकटाची कल्पना असते पण कदाचित मी सांगितले मार्ग आणि त्याला अभिप्रेत असलेला मार्ग सारखा असेल तर सुटका लगेच होयील या वेड्या आशेने; उत्तर देतो.  मग त्याच्या बुद्धी च्या पेटाऱ्यातून तो मला मी जाणारा मग कसा चुकीचा आहे, त्या मार्गाचे तोटे काय हे उधारणासहित स्पष्टीकरण देऊन सिद्ध करतो. नंतर त्याने सुचविलेल्या मार्गाच्या फायदाचा पाढा सुरु होतो. मी ही त्याला उद्या पासून मी याच मार्ग वरून जाणार असे ठाम पणे सांगतो. वास्तविक मी ऑफिस ला गेली १० वर्ष जात आहे . मी जवळ जवळ सगळे मार्ग वापरून पहिले आहेत. तुमचे नशीब त्या दिवशी कसे आहे (म्हणजे  तुम्हाला लागणारी गर्दी, सिग्नल, मोर्चे, धरणे, अपघात, पोलीस वगैरे) यावर लागणारा वेळ हे अवलंबून आहे हे गणित मला सुटलेले आहे. पण ही संध्याकाळची लढाई सगळ्यात अवघड. यात तुमचे व्यक्तीकौश्यालाचे सगळे गुण कामी येतात. म्हणजे दोन तास विना तक्रार एकाच जागी गाडीत बसून राहणे (दोन तासानंतर कळते पुढे काही अपघात वगैरे नव्हे तर एक नेता विमानतळाला जात आहे आणि पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत), किंवा कोणी तरी डाव्या बाजूने येऊन एकदम उजवीकडे वळतो (सिग्नल दाखवण्याची गरज भित्र्या लोकांसाठी आहे) किंवा सिग्नल सुटून पुढे जाताना समोर असलेल्या कोण्या एका वाहनचालकाची गाडी बंद पडते आणि ती सुरु होऊ पर्यंत सिग्नल परत बंद होतो.'सावधान चालक शिकत आहे' हे लिहिलेले असताना तो चालक जर महिला असेल तर गाडी १८० कोनामध्ये वळून दुसऱ्या मार्गाने जाणे वगैरे वगैरे...असो

रात्री लढाई असते ती TV शी. पत्रिकेत कितीही गुण जुळत असले तरी मला वाटते ते गुण TV कार्यक्रम वगळून असावेत. कारण मला बातम्या आणि हिला स रे ग म प हेच कसे पाहिचे असते हे कळत नाही. बर ही मुंबई ची असल्यामुळे क्रिकेट याविषयी हिला विशेष प्रेम जिव्हाळा आहे. सध्या IPL चालू असल्या मुळे समजोता एक्प्रेस वेळेवर धावते आहे. ..असो

विश्वास वाटतो माझ्या भा. पो. (भावना पोहोचल्या) असतील.

रजा घेतो.