October 16, 2011

पहिला उरला नाहीस तू


दहावी "फ"

पहिला उरला  नाहीस  तू
असा  कसा  बदलास  तू ?
वेगळाच  माणूस  झालास  तू
दूर  कुठे  गेलास  तू ?
पहिला  उरला  नाहीस  तू

कोण  जाणे  मी  होतो  काय ?
कोण  जाणे  मी  आहे  काय ?
हे  शोधात  शोधात  जाणे  म्हणजेच  जगणे  नाही  काय ?

सारे  जग  झालाय  उंदरा  माजाराचा  खेळ
मनाचे  गाणे  ऐकायला  आहे  कोणाला  वेळ ?

उधात  माथ्याचा  एक  तरुण
आता  कुठे  जागे  होऊन
म्हणतोय  आपण  माणूस  शोधू
तुटल्या  मनाच्या  भिंतही  संधू

अर्रे  तू , तू  तरी  म्हणू  नकोस  दोस्त ,
असा  कसा  बदलास  तू .

का  नाही  जयेचे  मी  दूर  देशात ?
स्थान  मिलावाचे  नव्या  समाजात
कर्तुत्व  दाखवाचे  माझ्या  विषयात
का  कुढत  राहेचे  निराश  मनात ?

समजून  कसे  घेत  नाहीस  तू ?
असा  कसा  बदलास  तू ?
पहिला  उरला  नाहीस  तू .

माझे  भांडण  नाहीये  तुझ्याशी
माझा  सव्वाद  आहे  केवळ  माझ्याशी
ओलांडाचे  सुधा  आहेत  मला  समुद्र सात
भटकंती  कार्याची  आहे  ह्या  आयुषात .
नवे  नवे  प्रयोग  पाहीन जगाच्या  पाठीवर
माझी  मात्र  कविता  गिरवीन माझ्याच  माझ्याच मातीवर

मी  आणि  माझी  ही  पोर
सोडूया  म्हणतोय  हे  कोड  सार

पण , पण  दोस्तीत नसतात  पडत  प्रश्न  असले
काही  छान correct  जमले …काही  थोडक्यात  फसले

तुझ्या  मनाची  उभारी …माझही  माझ्हीच  तर  आहे  सारी
एक  वाटेने  जाऊ  काय  आणि  नाही  काय …..

September 6, 2010

ठोसेघर


ठोसेघर

पुण्याचे एक वैशिष्ठ म्हणजे तुम्ही २०-३० किलोमीटर गेला की निसर्ग तुमचे मनापासून स्वागत करतो. मुळशी, मावळ या भागाला तर निसर्गाने भरभरून दिले आहे. पण आम्ही नेहमीचा रस्ता सोडून कुठे तरी जायचा बेत ठरवला. सातारा पासून २०-२५ किलोमीटर असलेले ठोसेघर धबधबा दीपा ने आजून पहिला नव्हता. (त्यात तिचा कही दोष नाही, जवळ जवळ सर्व मुंबईकरांचा लोनावाला, महाबलेश्वर झालेच तर माथेरान याशिवाय दुसरीकडे कुठे भटकंती करता येते या वर विश्वास नसावा. किंवा त्यांचा ते गावी ही नसावे. असो.)

सकाळी गड़बड़ करून पहाटे ( ११ वाजता ) सातारा कड़े कूच केले. रस्ता खुप चांगला असल्यामुळे कधी सातार्यात पोहोचलो ते समजलेपण नाही. सातारा मधे पत्ता कोणालाही विचारू नये. कारण आम्ही एक दोन लोकाना ठोसेघर चा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला, पण ज्याला पत्ता विचारू तो जणू काही ओसामा बीन लादेन चा पत्ता विचारला असे भाव करून 'सरळ जा' असे सांगत होता. एक रिक्षावाल्या काकांनी तर कमाल केली, "ठोसेघर ला जाचे? सोपा आहे. बोगदा रस्ता पकडा आणि सरळ जा". "पण हा बोगदा रस्ता कुठे आहे?". "सरळ जा आणि तुम्हाला एक शिवाजी पुतळा लागेल, तिथे डावीकडे वळा. तोच बोगदा रस्ता". 'डावी कडे वळा' हे त्यांनी उजव्या हाताने हवेत अर्धगोल काढून रीतसर उजवीकडे दाखवले होते. 'काय बोलतो पेक्षा काय करतो' याला जास्त महत्व असते या रामदासांच्या वचना प्रमाणे आम्ही डावीला मनात उजवी करून पुढे निघालो. पुढे शिवाजी पुतळा ला रीतसर उजवी कडे वळून आम्ही बोगदा रस्ता पकडला.
बोगदा तसा फार लहान आहे, पण त्याच्या नावाने रस्ता ओळखला जावा इतके त्याचे वजन आहे. बोगदा पार केल्यावर जणू काही सिनेमा ची रीळ बदलावी असा निसर्ग बदलला. धुक्यानी सगळी वाट झाकली गेली होती. खूप पाउस नसला तरी अधून मधून एखादी सर येत होती. एके ठिकाणी गाडीच्या बंद काचा उघडल्या तर गाडी मध्ये धुके आले. जवळचे पण काही दिसेना. 

वाटेत बरेच लोक आपल्या शेळ्या, गायी चरायला घेऊन आले होते. एरवी बोजड वाटणारे डोंगर सुद्धा हिरव्याशालीमुळे  नाजूक वाटत होते. चहाचे मळे जसे चाऱ्या पडून बनवतात त्याच सारखे डोंगरावर हिरवे गावात उगवले होते. हवेत खूप गारवा होता.


हवेतील ऑक्सिजन २०० टक्के असल्या सारखे वाटत होते. पावसामुळे रस्ते एकदम स्वच्छ धुवून निघाले होते. घाटाचा रस्ता खूपच कमी वाहतुकीचा होता. मधूनच एखादी जीप समोरून येत होती. 




वळणे वळणे पार करत शेवटी आम्ही ठोसेघरला पोहोचलो. मी जवळ जवळ १०/१२ वर्षाने ठोसेघर ला येत असेन. मला वाटले खूप गर्दी असेल पण इथे चीट पाखरू पण नव्हते. गाडी लावायला एका ध्याब्या समोर जागा आहे. धाबातील आजोबांकडे जेवण मिळेल याची खात्री करून धबधब्याकडे निघालो. सातारा वन विभागाने धबधब्याकडे जाण्यासाठी सिमेंटच्या पायरया केल्या आहेत. दुरवर असून आम्हाला पाण्याचा स्पष्ट आवाज येत होता. थोडे अंतर पुढे गेल्यावर आम्हाला धबधब्यचे पहिले दर्शन झाले.धबधबा एक दम विलोभनीय होता. खरेतर इथे एक नसून दोन धबधबे आहेत. दोनही जवळजवळ २०० फुट असावेत. जिथे धबधबा जमिनीवर पडत होता तिथून एक १०० फूट परत वर पाणी उडत होते.


आम्ही थोडावेळ थांबून परत निघालो. पोटात कावळे आक्रोश करत होते. परत वर जात असताना आजून एक वाट दिसली. त्या वाटे वरून गेलो तर आजून एक मोठ्ठा धबधबा दिसला. तोही २०० ते २०० फुट खोल असावा. पण तो तीन विभागात वाटला गेल्या मुळे वेगळा भासत होता. तो १०० फुटावर एका दगडावर पडून मग परत १०० फुट अजून एका दगडावर पडत होता. 
पाय निघत नसला तरी पापी पेट थांबू देत नव्हते. आम्ही जेवणं साठी परत धाब्याकडे निघालो.

एक गोष्ट चांगली वाटली - वन-विभागाने दोन्ही ठिकाणी सिमेंटचा डेक बनवला आहे. त्यामुळे धबधबा पाहणे सोपे आणि सुरक्षित झाले आहे.

वर येऊन जेवणावर यःतेच्छ ताव मारून परत पुण्याकडे येण्यास निघालो. भरपेट जेवण आणि अमुराद निसर्ग चा आनंद लुटला मुळे झोप येत होती. पण घाटात एक ठिकाणी फक्कड गरम गरम मसाला चहा मिळाला. जरा काळ सूर्य देवता आपले दर्शन देण्यासाठी बाहेर आले आणि कधीही पुण्यात न दिसणारे इंद्रधनुष आम्ही अनुभवले. सूर्य देवाचा बहुदा झोपेचा ब्रेक असावा.आम्ही हि आमचा प्रदूषण विरहीत हवेचा, नो ट्राफिकचा ब्रेक संपून रात्री पुण्यात परतलो.






May 5, 2010

आंबा पुराण

उन्हाळा आवडणारा प्राणी (म्हणजे मनुष्य प्राणी हो) शोधून सापडणार नाही. अहो कसा आवडणार? आठवा ते उन ! आठवा त्या घामाच्या धारा !  आठवा तीच तीच फ्यान ची गरम हवा ! कुठे जायची सोय नाही. सकाळी आठ साडे-आठ पासून उन्हाचा चटका जाणवल्या शिवाय राहत नाही. कसा आवडणार? पण मला लहानपणापासून उन्हाळा आवण्याची दोन ठळक कारणे आहेत. एक आंबा आणि दोन दुसरा आंबा !

खरच निसर्गाची काय किमया आहे कि नाही? देवाने वेळात वेळ काढून आंबा बनविला असणार. या फळाची गोडीच वेगळी. दुसरी फळे याचा समोर अगदीच बिचारी वाटतात. म्हणजे बघा सचिन तेंडूलकर आणि इतर फलंदाज याची तुलना करून पहा बर. तुलना करताना विचित्र वाटते ना? तेच सांगतोय आंब्याशी तुलना होयुच शकत नाही.

लहानपणी मी पितृपक्षची वाट पाहायचो. आम्ही त्या दिवशी आंबा खायला सुरवात करायचो. (का? माहित नाही. कदाचित तोपर्यंत आंब्याचे भाव खिशाला परवडतील असे होत असावेत). आंबे आणायला मी पप्पा बरोबर न चुकता जात असे. आंब्याच्या दुकानातला सुवास अगदी मंत्रमुग्ध करून टाकायचा. तिथे ठेवलेली आंब्याची रास पाहताना किती आंबे घेऊ आणि किती नको असे होत असे.  बर हे सगळे आंबे काही एका घराण्यातले नसायचे. कोणी देवगडचा, कोणी रत्नागिरीचा. आणि घराणे जसे वेगळे तसे घराण्यात परत जाती, कोणी हापूस, कोणी पायरी, कोणी तोतापुरी आणि पारंपारिक जातीय पद्धती प्रमाणे आंब्याला मानाची वागणूक मिळत असे. हापूसची स्वारी मानाप्रमाणे छान पेटी मध्ये वगैरे असायची. या उलट तोतापुरीच्या वाट्याला  कोपऱ्यातील टोपली ! मला आजून पर्यत कुणीही दुकानदारने तोतापुरी पेटीत दिला नाहीये.
अजून एक जाणवणारा फरक,  हापूस हा एकतर तीन, पाच किंवा दहा डझन याच पटीत विकला जायचा आणि तोतापुरीची उडी मात्र जास्तीस जास्त एक डझन पर्यंत.

लहानपणी आंबे खाल्ले याची साक्ष शर्टवर पडलेले पिवळे डाग बिनधास्त देत असत. खाताना दोनही हातावर रसाची धार आली नाही तरच नवल. आणि ती धार चाटून पुसून साफ केली नाही तर दुसरे नवल. आंबे खाण्याची हि पद्धत जवळजवळ सगळ्या भावंडानी आत्मसात केली होती. ती एका परंपरेनुसार मोठा भाऊ छोट्या भावाला प्रात्यक्षिकासह शिकवत असे. एका आंब्यावर माझे कधी भागले नाही. एक तो दुश्मन खाते है ! या थाटात मी आंबे रिचवत असे.

आईचे आंब्यावरचे प्रेम फक्त 'चला आता वेगळी भाजी टाकायची गरज नाही' या पुरते मर्यादित होते. आणि आंबरस पोळी हा कुणालाही कधी आवडेल असा मेनू आहे. त्यामुळे तिचे रोज रोज भाजी न करावी लागल्याने ती खुश आणि रोज रोज आमरस पोळी म्हणून आम्ही खुश अशी व्यावास्तापान्शात्रातील विन-विन सिचुवेशन होत असे.


परवा मोर मध्ये साउथ आफ्रिकन अल्फान्सो - ६० रुपये प्रती नग पाटी वाचली आणि मनात चर झाले. हापूस हा मान कोकणाचा ! तो साउथ आफ्रिकन अल्फान्सो कसा घेऊ शकतो? नंतर एक दोन दिवसात कोकणातील बराच आंबा आता निर्यात होणार असे वाचनात आले. म्हणजे कोणी गोरा तिकडे पल्याड बसून, आमच्या रत्नागिरी हापूस आंब्याचा 'इंडिअन अल्फान्सो' असा उच्चार करीत आस्वाद घेणार तर !


बर हे सगळे आंबा पुराण सांगायचे कारण असे की, काल आरुषला पारंपारिक पद्धतीने आंबा खाताना पाहून माझीही इच्छा बळकावली. आणि एक आंबा मी ही त्याच पद्धतीने रिचवला. नंतर दोघेही आंबा खाल्याची साक्ष देणारे शर्ट घरभर मिरवत होतो.  लहानमुला मध्ये दुसरे बालपण जगतात हे म्हणणे काही उगाच नाही.

April 29, 2010

बिकट वाट वहिवाट नसावी variation

गाणे: बिकट वाट वहिवाट नसावी
गायक : शाहीर साबळे
शब्द : अनंत फांदी

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको 
संसारमध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको

माय बापावर रुसू नको आणि दुर्मुखलेला हसू नको
व्यवहारामध्ये फसू नको आणि कधी रिकामा बसु नको
परी उलाढाली पलबलत्या पोटासाठी करू नको

संसारमध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको

मी मोठा शाहणा धनाढ्य ही गर्व भाव हा वाहू नको 
एकाहूनएक चढ़ जगापरी थोरपणाला मिरवू नको
दोन दिवसांची जाईल सत्ता आपेशमाता घेऊ  नको

संसारमध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको

उगीच निंदा स्तुति कुणाची स्वैतासाठी करू नको
कष्टाची परी भाजी भाकरी तुपसाखरे चोरु नको
दिली स्तिथी देवाने तीतच मान्ये सुख कधी मिटू नको

संसारमध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको 
 संसारमध्ये ऐसा आपला उगाच भटकत फिरू नको

बिकट वाट वहिवाट नसावी

गीत-अनंत फंदी
संगीत-शाहीर साबळे
स्वर-शाहीर साबळे 
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको

मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुस-याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

आता तुज गोष्ट ही सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको
सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको
 
 









April 13, 2010

माझी लढाई

माझी लढाई


मी रोज प्रत्येक प्रहरात कोणती न कोणती लढाई लढत असतो.  सुरवात होते ती सकाळच्या लढाईने; ती असते झोपेशी !  मला लहानपणी शनिवार आवडायचा नाही कारण सकाळची शाळा !  लहानपणा पासूनच मी ही झोपेशी लढाई खेळत आलो आहे. अजूनही ती चालूच आहे. घड्याळवर चार पाच सहा सात हे आकडे संध्याकाळी वेळ दाखवण्याची पंचायीत नको म्हणून असतात असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे '१ जानेवारी पासून मी सकाळी पळायला जाणार आहे' या माझ्या संकल्पाला कोणाही सीरीओसली घेत नाही. मी बरेच उपाय करून पाहिलेत त्यापैकी जाहीर करता येतील ते असे - १. तीन वेग वेगळी गजराची घड्याळे वेग वेगळ्या ठिकाणी ठेवणे २. उशीवर ज्या वेळेला उठायचे तितक्यावेळा टकटक करायचे. ३. उन येईल या पद्धतीने खिडकी उघडी ठेवायची ४. बायको ला ... ... असो


नंतर ची लढाई हि ऑफिसला पोहोचल्यावर सुरु होते. पार्किंग शोध लढायी ! तसा मी रोज वेळेवर (म्हणजे माझ्या वेळेला) ऑफिसला जातो. पण  मला मात्र पार्किंग फुल चा बोर्ड पाहून रोज दुखः होते. बर बाहेर गाडी लावयाची म्हणजे काय गेट बाहेर लगेच जागा मिळते काय? माझ्या सारखे वेळेवर (परत आपआपल्या वेळेवर) येणार्यांची संख्या बरीच आहे त्यामुळे बाहेरचे पार्किंगही फुल झालेले असते.  रिकाम्या जागेवर बारीक नजर ठेवत, हळू हळू गाडी पुढे नेत शेवटी एक रिकामी जागा दुरून आपल्या डोळ्यात भरते पण आपण इथे पोहोचू पर्यंत अजून कोणी एका वीराने ती पटकावली असते. मग हताश न होता पुढची जागा नक्की आपली असे म्हणत मनाला आधार द्यावा लागतो. इतक्यात फोन आपले अस्तित्व ( नको तिथे) सिद्ध करून वाजतो. दुसऱ्या बाजूला कोणी तरी मीटिंग साठी आपली वाट पाहत थांबलेला असतो. त्याला जिना चढतोय. पोहोचतोच असे सांगून, दोन एक शिव्या देत, लेकाचा काय पंतप्रधान समजतो काय स्वतःला?  म्हणत फोन बंद करतो.आणि दुरून एक जागा रिकामी दिसते. जवळ जाता 'इथे पार्किंग करू नये - नाही तर हवा सोडण्यात येईल' ही ओळखीची पाटी स्वागतास सज्ज असते. आता माझा धीर सुटत असतो. इतक्यात फोन परत वाजतो.  तो उचलण्याची शक्ती नसते. सरते शेवटी दूर ( साधारणपणे १ कि मी) एक छोट्टी जागा मिळते.मग एका हातात डबा, एका हातात laptop  असे करत तितकेच अंतर मला चालत जावे लागते.,मला वाटते ऑफिस मध्ये लोकांना मी बहुदा चालत ऑफिसला येतो असे वाटत असणार. कारण मला गाडी घेऊन ऑफिस मध्ये फार थोड्या लोकांनी पहिले आहे.....असो

संध्याकालची लढाई असते ती ट्राफिकशी ! पुण्यात हि लढाई न पाहिलेला सापडणे कठीण आहे. माझ्या ऑफिस जाण्याच्या मार्गावर आता PHD होयील कदाचित. जो कोणी भेटतो तो ऑफिस कुठे आहे विचारल्या नंतर; कल्याणी नगर? बापरे ! मग कोथरूड वरून कसा जातोस? हा ठरलेला प्रश्न विचारतो. मला पुढील संकटाची कल्पना असते पण कदाचित मी सांगितले मार्ग आणि त्याला अभिप्रेत असलेला मार्ग सारखा असेल तर सुटका लगेच होयील या वेड्या आशेने; उत्तर देतो.  मग त्याच्या बुद्धी च्या पेटाऱ्यातून तो मला मी जाणारा मग कसा चुकीचा आहे, त्या मार्गाचे तोटे काय हे उधारणासहित स्पष्टीकरण देऊन सिद्ध करतो. नंतर त्याने सुचविलेल्या मार्गाच्या फायदाचा पाढा सुरु होतो. मी ही त्याला उद्या पासून मी याच मार्ग वरून जाणार असे ठाम पणे सांगतो. वास्तविक मी ऑफिस ला गेली १० वर्ष जात आहे . मी जवळ जवळ सगळे मार्ग वापरून पहिले आहेत. तुमचे नशीब त्या दिवशी कसे आहे (म्हणजे  तुम्हाला लागणारी गर्दी, सिग्नल, मोर्चे, धरणे, अपघात, पोलीस वगैरे) यावर लागणारा वेळ हे अवलंबून आहे हे गणित मला सुटलेले आहे. पण ही संध्याकाळची लढाई सगळ्यात अवघड. यात तुमचे व्यक्तीकौश्यालाचे सगळे गुण कामी येतात. म्हणजे दोन तास विना तक्रार एकाच जागी गाडीत बसून राहणे (दोन तासानंतर कळते पुढे काही अपघात वगैरे नव्हे तर एक नेता विमानतळाला जात आहे आणि पोलीस त्यांचे कर्तव्य बजावत आहेत), किंवा कोणी तरी डाव्या बाजूने येऊन एकदम उजवीकडे वळतो (सिग्नल दाखवण्याची गरज भित्र्या लोकांसाठी आहे) किंवा सिग्नल सुटून पुढे जाताना समोर असलेल्या कोण्या एका वाहनचालकाची गाडी बंद पडते आणि ती सुरु होऊ पर्यंत सिग्नल परत बंद होतो.'सावधान चालक शिकत आहे' हे लिहिलेले असताना तो चालक जर महिला असेल तर गाडी १८० कोनामध्ये वळून दुसऱ्या मार्गाने जाणे वगैरे वगैरे...असो

रात्री लढाई असते ती TV शी. पत्रिकेत कितीही गुण जुळत असले तरी मला वाटते ते गुण TV कार्यक्रम वगळून असावेत. कारण मला बातम्या आणि हिला स रे ग म प हेच कसे पाहिचे असते हे कळत नाही. बर ही मुंबई ची असल्यामुळे क्रिकेट याविषयी हिला विशेष प्रेम जिव्हाळा आहे. सध्या IPL चालू असल्या मुळे समजोता एक्प्रेस वेळेवर धावते आहे. ..असो

विश्वास वाटतो माझ्या भा. पो. (भावना पोहोचल्या) असतील.

रजा घेतो.

March 23, 2010

डोम्बारयाचा खेळ !

डोम्बारयाचा खेळ !

खुप दिवसांपूर्वी मी शाळेतून घरी जाताना अचानक रस्त्यावर पाच पन्नास लोक गोल करून काहीतरी पाहताना दिसली. जवळ जाउन पाहिले तर एक डोंबारी काही तरी खेळ दाखवत होता. खेळ फारसा आठवत नाहीये. पण तो मधूनच लोकांना 'हाताची घडी घालून उभे राहू नका' 'टाळी वाजवा ना' असे फर्मावत होता. उछुकता वाढली म्हणून जरा वेळ तिथे थांबलो. खेळ चालू होता आणि अचानक एक प्यांट-शर्ट घातलेला, पोलीसा सारखा दिसणारा, धिप्पाड माणूस 'खेळ बंद करा रे' असे ओरडत पुढे आला.
डोम्बार्याने त्याला विचारले 'काय झाले? तुम्ही खेळ थांबवला का? तुम्ही खेळ थांबवला का?' तो इसम थंड आवाजात 'हो मीच थांबवला' असे सांगत होता. मग त्यांची शाब्दिक चकमक सुरु झाली. तो पोलीस सदृश इसम डोम्बार्याला एकेरी शब्दात खडसावत होता. त्याच्या उलट डोंबारी त्याची विनवणी करीत, मध्येच लोकांना उद्देशून काहीतरी बोलत होता. आशयाच्या विस्तारामध्ये मध्ये न जाता पुढील भाग सांगतो.

वरील प्रकार एक १०-१५ मिनिटे चालू होता. आत्तापर्यंत चालू आसलेली शाब्दिक चकमक आता हातापाई वर येऊन पोहोचली होती आणि बघ्यांची गर्दीही दुप्पट झाली होती. अचानक ते दोनही इसम (डोंबारी आणि धिप्पाड माणूस) एकदम थांबले. वाद थांबला, ओरडणे थांबले. आवाज शांत झाले. तो धिप्पाड माणूस हातात डोम्बार्याची टोपी घेऊन गर्दीकडे वळला. तो आता पुढे काय करतोय हे पाहण्यासाठी जवळजवळ सगळ्यांनीच टाचा उंच केल्या. पुढच्या सेकंदाला तो इसम, 'खेळ आवडला असेल तर दिल खोल के पैसा डालो' असे म्हणत, टोपीत पैसे गोळा करीत होता. वास्तविक तो 'धिप्पाड इसम' हा डोम्बार्याच्या खेळातील एक भाग होता. त्यांनी केलेले भांडण, ड्रामा, मारामारी सगळीच लुटुपुटूची होती. त्यात काहीही खरे नव्हते. सगळे खोटे होते. थोडाच वेळात त्याची टोपी भरली. लोकही पांगले. आणि ते दोनही इसम पैसे मोजण्यात गुंतले. त्यांचा चेहऱ्यावर आनद दिसत होता. त्यावरून गल्ला चांगला जमला असे भासत होते.



***


कालच टीव्ही वर चैनेल बदलत असताना एके ठिकाणी दोन इसम जोरजोरात भांडताना दिसले. कदाचित 'लोकसभा चैनेल' असेल असे समजून मी पुढील चैनेल लावणार इतक्यात लावलेला चैनेल लोकसभा नसून एक प्रसिद्ध (?) हिंदी चैनेल आहे आणि तो कार्यक्रम हा एक (परत प्रसिद्ध (?))  रियालीटी शो आहे हे कळले. माझी उछुकता वाढली. अजून चौकशी करता समजले की हा शो खूप TRP खेचतो आहे.

कार्यक्रमाचा शेवटी दोनही इसम आपली 'धाप' आवरून लोकांना SMS करण्या विषयी आवाहन करीत होते. माझी जिज्ञासूवृत्ती मला शांत बसू देत नव्हती. मी गुगल वर सर्च केला. त्यात त्या शो विषयी बरीच माहिती होती. तो शो एका विदेशी शो वर आधारलेला होता. अजून विस्तारित माहिती पाहता त्यात शोला मिळणाऱ्या पैशांचे आकडे तोंडाला फेस आणणारे होते. विशेष म्हणजे हा सगळा पैसा लोंकाचा होता.दोन/पाच रुपयाचे संदेश प्रत्येक आठवड्याला पाठवायचे आणि बारा आठवडे हा कार्यक्रम चालतो. TRP जास्त असल्याने SMS ची संख्याही बरीच होती. इतके मोठ्या पैशांचे गणित मला चटकन सुटले.

***

कळत नकळत वरील दोनही प्रसंगाची तुलना केली तर रियालीटी शो हा किती रियल आहे? हा प्रश्न पडतो. एक मात्र नक्की दोनही प्रसंगात लोकांना बळीचा बकरा करून पैसे उकळण्यात आले होते. (दोनही प्रमाणात प्रचंड तफावत आहे). डोमाबार्याचा एका खेळ नंतर तेच लोक कदाचित (न भूलता) परत तोच खेळ पाहण्यासाठी थांबणार नाहीत पण रियालीटी शोच्या प्रेक्षकांचे मात्र तसे नाहीये. तेच प्रेक्षक परत परत बळी पडतायेत. याला कारण डोम्बारी सारखा 'खरेपण' रियालीटी-शो त नाहीये. डोंबारी खेळ संपला असे जाहीर करून लोकांना सत्य सांगतो. त्यात कळते की सगळे खोटे होते. रियालीटी-शो मात्र त्याच प्रेक्षकांना सारखा बकरा बनवते. आणि ही भोळी जनता त्याला बळी पडते. यात ६० वर्ष पासून ते १० वर्ष पर्यंत सगळा प्रेक्षक गण आहे.

***
हे रियालीटी शो पाहियेचे का हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे पण एक मात्र नक्की डोंबारी 'Copyrights viloation'  म्हणून रियालीटी-शो वाल्यांना कोर्टात खेचू शकतात. कदाचित तो सुद्धा एक रियालीटी-शो व्होऊ शकतो. नाही का?